खडसेंचे सीडीआर कोणाच्या सांगण्यावरून काढले?
|
महसूल मंत्री एकनाथ खडसे |
जळगाव/ मुंबई : जळगावात कोणतीही चौकशी अथवा गुन्हा दाखल झालेला नसताना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महसूमंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड (सीडीआर) कोणाच्या सांगण्यावरून काढले,असा सवाल करत एटीएसकडून स्टेटमेंटसाठी आपल्यावर दबाव येत असल्याचा आरोप एथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला. दाऊदच्या निवासस्थानावरुन खडसेंना आलेल्या कॉल्सची माहिती दाखवून त्याचा डेमो सादर केला. दाऊदच्या पत्नीच्या क्रमांकावरून खडसेंच्या मोबाईलवर सात वेळा संभाषण झाले आहे. यावेळी मार्च व एप्रिलचे बील त्याने दाखविले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे भंगाळे याने सांगितले.
रक्षा खडसेंनी घेतली मोदींची भेट
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे
यांनीही गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, अशी माहिती आहे. आपल्या सासऱ्यांविरुद्ध कोण लोक काम करीत आहेत हे त्यांनी मोदींच्या कानी घातल्याचे समजते.
ई-मेलचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न
गेल्या तीन दिवसापासून दररोज रात्री दहा वाजता माझ्या ई-मेल आयडीचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न कोणाकडून तरी केला जात आहे. याबाबत मी मुंबई पोलिसांना विचारणा केली असता आमच्याकडून असा प्रयत्न होत नाही. गरज वाटेल तेव्हा आम्ही तुमच्याकडून हा पासवर्ड घेऊ शकतो, असे उत्तर मला देण्यात
आले. एकूण तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भंगाळे म्हणाला.कृषीमंत्री म्हणून मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करू द्या. विरोधकांकडून नियोजनबद्धपणे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. बिनबुडाच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. प्रसारमाध्यमांनी मला शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करू द्यावे, असे माझे आवाहन आहे.
- एकनाथ खडसे, महसूलमंत्री
आंतरराष्ट्रीय कॉल्सचे प्रकरण देशाशी निगडित विषय असताना, खडसे हे केवळ मंत्री व सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांच्यावर कारवाईस विलंब होत आहे. तसेच जळगावचे पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी देशहिताच्या दृष्टिकोनातून सीडीआर काढले असते तर मग एकट्या खडसेंचेच का? अन्य चार जणांचे का काढले नाही, असा सवाल भंगाळे याने केला.
>> खडसे-दानवे भेट झालीच नाही !
जालना : जमीन खरेदी प्रकरण व इतर आरोपांमुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी खडसे हे खा. दानवे यांची भेट घेणार होते. मात्र आरोग्याच्या कारणास्तव खडसे यांनी भेट न घेता दानवे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांकडून मागविला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो सादर केल्यानंतर अमित शहा यांनी खडसे यांना खा.दानवे यांची भेट घेण्यास सांगितले होते.
MBA Notes,MPSC,News,Health Treatment at Home,